कुऱ्हा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ४.४७ कोटींची मंजुरी: आ. चंद्रकांत पाटील यांना यश…

कुऱ्हा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ४.४७ कोटींची मंजुरी: आ. चंद्रकांत पाटील यांना यश…
मुक्ताईनगर: तालुक्यातील आदिवासी व दुर्गम भागातील ३५ ते ४० गावांना आरोग्यसेवा पुरवणाऱ्या कुऱ्हा प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. हा प्रश्न गांभीर्याने घेत आ. चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन मंडळ व तत्कालीन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्याचा परिणाम म्हणून केंद्राच्या नवीन इमारतीसाठी रु. ४.४७ कोटी निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
या निधीचा उपयोग आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीसह अंतर्गत रस्ते, काँक्रीटीकरण, विद्युतीकरण, पाणीपुरवठा आणि अन्य मूलभूत सुविधांसाठी केला जाणार आहे. यासंदर्भातील आदेश २८ नोव्हेंबर २०२४ रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव यांनी मुख्य अभियंत्यांना तांत्रिक मंजुरीसाठी पाठविले आहेत.
आचारसंहिता संपल्यानंतर कामाला गती:
सार्वत्रिक निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडलेले हे काम आता वेगाने पुढे जाईल. लवकरच टेंडर प्रक्रिया सुरू होऊन कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल, अशी माहिती आमदारांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी यांनी दिली आहे.
या विकासकामामुळे दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सुविधांचा लाभ होऊन त्यांच्या आरोग्यविषयक समस्या कमी होतील, अशी अपेक्षा आहे.