जि.प. मराठी प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न: शंभर टक्के पटनोंदणी साध्य

जि.प. मराठी प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न: शंभर टक्के पटनोंदणी साध्य
मुक्ताईनगर तालुका | प्रतिनिधी
घोडसंगाव येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 ची सुरुवात दि. 16 जूनपासून झाली असून, जि.प. मराठी प्राथमिक शाळेत पहिल्याच दिवशी प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षीपासून जिल्हा परिषद शाळांमध्ये सीबीएससी पॅटर्न लागू करण्यात आला आहे, ज्यामुळे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतूने पालकांचा विश्वास अधिकच वाढला आहे.
इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना जिल्हा परिषद शाळांमध्येच मुलांना प्रवेश देण्याचे आवाहन करण्यात आले होते, त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी 31 पैकी 31 पात्र विद्यार्थ्यांनी इयत्ता पहिलीत प्रवेश घेत शंभर टक्के पटनोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले.
प्रवेशोत्सवाचे आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांची पारंपरिक वेशभूषेत फेटे बांधून बैलगाडीतून काढण्यात आलेली मिरवणूक. शाळेच्या आवारात तयार करण्यात आलेल्या विशेष सेल्फी पॉईंटवर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आनंदाने छायाचित्रे काढली. प्रत्येक विद्यार्थ्याचा बुके देऊन सत्कार करण्यात आला, तसेच त्यांना खाऊ आणि शैक्षणिक साहित्य – पुस्तके, गणवेश व बूट – वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश भगत, सरपंच सौ. प्रतिभा कोल्हे, समिती सदस्य अर्जुन कोळी, विनोद जावरे, गजानन कांदेले यांच्यासह अनेक पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षण विस्तार अधिकारी सुनील कोंघे साहेब, केंद्रप्रमुख विजय दुट्टे, तसेच विषय साधन व्यक्ती महिंद्र मालवेकर यांनीही कार्यक्रमास भेट देऊन उपस्थितांचे कौतुक केले.
या यशस्वी कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक अनिल पवार सर, शिक्षक भिका जावरे सर, सोमनाथ गोंडगिरे सर, गोपाल दुतोंडे सर आणि स्वाती भंगाळे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.
जि.प. शाळांचे शिक्षणाच्या नव्या युगात स्वागत करत विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या आदरातिथ्याने आणि सकारात्मक वातावरणाने उपस्थित सर्वांची मनं जिंकली.