मुक्ताईनगरात वारकरी आणि हिंदू समाजाचा संताप: उघड्यावर मांस विक्री तातडीने थांबविण्याची मागणी उघड्यावर मांस व मासे विक्री तात्काळ बंद करा-ह भ प रवींद्र हरणे महाराज…

मुक्ताईनगरात वारकरी आणि हिंदू समाजाचा संताप: उघड्यावर मांस विक्री तातडीने थांबविण्याची मागणी

उघड्यावर मांस व मासे विक्री तात्काळ तात्काळ बंद करा-ह भ प रवींद्र हरणे महाराज…
मुक्ताईनगर, संत मुक्ताईंच्या पावन भूमीत धार्मिक आणि सांस्कृतिक संवेदनशीलतेच्या मुद्द्यावर वारकरी आणि हिंदू बांधवांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. संत मुक्ताई पालखी मार्ग तसेच शालेय मार्गावर परवानगीविना उघड्यावर मांस आणि मासे विक्री केली जात असल्याबद्दल वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्यामुळे समाजात तीव्र नाराजी पसरली आहे.
वारंवार निवेदने देऊनही संबंधित समस्या कायम राहिल्यामुळे संत मुक्ताई वारकरी फडकरी व कीर्तनकार महासंघाचे अध्यक्ष हभप रविंद्र हरणे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आज, 10 डिसेंबर 2024 रोजी, विविध धार्मिक व सामाजिक संस्थांच्या वतीने तहसीलदार, पोलीस निरीक्षक, आणि नगरपंचायत कार्यालय येथे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनाद्वारे शहरातील उघड्यावर सुरू असलेल्या मांस विक्रीला कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी वारकरी संप्रदाय आणि पंचक्रोशीतील हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे होत्या:
1. सार्वजनिक ठिकाणी मांस विक्री बंद करावी.
2. धार्मिक स्थळे आणि पायी दिंडी मार्गांवर स्वच्छता व श्रद्धेचे वातावरण टिकवले जावे.
3. हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या व्यवसायावर निर्बंध आणावेत.
बांगलादेशमधील हिंदू धर्मीयांवर हल्ल्यांचा निषेध
निवेदनादरम्यान, बांगलादेशमध्ये हिंदू धर्मीयांवर आणि त्यांच्या धार्मिक स्थळांवर झालेल्या हल्ल्यांचाही तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच, हिंदू बांधवांनी एकत्र येऊन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी जागरुक राहावे, असे आवाहन करण्यात आले.
सहभागी संस्था आणि मंडळे
या निवेदनात पंचक्रोशीतील 25 हून अधिक धार्मिक आणि सामाजिक संस्थांचा सहभाग होता. रामरोटी आश्रम, संत मुक्ताई बहुउद्देशीय संस्था, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, साई प्रतिष्ठान यांसारख्या विविध संघटनांनी आपल्या पाठींब्याची भूमिका स्पष्ट केली.
कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती:
आमदार कन्या कु. संजना चंद्रकांत पाटील वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार आणि विविध धार्मिक संघटनांचे सदस्य.
महसूल विभाग आणि पोलिस प्रशासनाची भूमिका
उघड्यावर मांस विक्री रोखण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्याची जबाबदारी प्रशासनावर सोपवण्यात आली असून या मागण्यांसाठी त्वरित उपाययोजना होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
सामाजिक एकतेचा संदेश
हा उपक्रम हिंदू बांधवांनी केवळ धार्मिक संवेदनशीलतेसाठी नव्हे, तर समाजात स्वच्छता, शांतता, आणि एकात्मतेचा संदेश देण्यासाठी राबविला आहे.
मुक्ताईनगरातील या आंदोलनामुळे धार्मिक आणि सामाजिक समस्यांवर तोडगा निघण्याची अपेक्षा आहे, तसेच स्थानिक प्रशासनावर जबाबदारीची जाणीव निर्माण झाली आहे.